२४ वर्षाचा ग्रामीण युवक, २५०० करोडची कंपनी
------------------------------------------------------------------------------------
ओरिसातल्या रायगडा गावात सॅक्रेड हार्ट स्कूलमध्ये शिकणाऱ्या रितेश अग्रवाल नावाच्या शाळकरी मुलानं वयाच्या तेराव्या वर्षीच उद्योग-व्यवसायात पडायचं ठरवलं. माध्यमिक शिक्षण पूर्ण होताच कॉलेजला जायच्या निमित्तानं घराबाहेर पाऊलही ठेवलं. सिमकार्ड विक्री सुरू केली. चारेक वर्षं तो व्यवसाय चालला. पण रितेशला स्वप्न पडायला लागली आणखी काही मोठं करण्याची.बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं होतंच. पुढलं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जायचा बेत रितेशनं घरी सांगितला आणि थेट दिल्ली गाठली. ते वर्षं होतं २०११. लंडन युनिव्हर्सिटीनं नवी दिल्लीत सुरू केलेल्या स्कूल ऑफ बिझिनेस अॅँड फायनान्स या संस्थेत त्यानं नाव नोंदवलं; परंतु ते होतं, फक्त घरच्यांचं समाधान होण्यापुरतं. थोड्याच दिवसांत रितेशनं कॉलेज सोडलं. स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू केला. एका इंग्रजी वृत्तपत्रानं त्याची मुलाखतही घेतली. ती वडिलांनी वाचली. मात्र त्यांना धक्काच बसला.
ते दिल्लीत आले. रितेशला भेटले, त्याला व्यवसायात मिळणाऱ्या यशानं खरं तर ते सुखावले होते; परंतु रितेशच्या आईचं म्हणणं वेगळंच होतं. तिची समजूत काढण्यासाठी रितेशला अख्खा दिवस खर्ची घालावा लागला. परंतु आईचं समाधान होईना. नोकरी न करता धंदा-बिंदा करत बसलास तर तुला मुलगी कोण देणार, हा होता तिचा सवाल. रितेशनं किमान पदवीधर तरी व्हायला हवं, असं तिचं म्हणणं होतं.
पण रितेशचं म्हणणं वेगळंच होतं. ‘हफिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं ते व्यक्तही केलं होतं. ‘कॉलेजचं शिक्षण आणि त्यासाठी द्यावी लागणारी वर्षं हे सगळं वेळ वाया घालवण्यासारखं आहे. ते शिक्षण तुम्हाला तुमच्या नियत उद्दिष्टांपासून लांबच नेतं. औपचारिक शिक्षण नसेल; परंतु कल्पनाशक्ती असेल, मनगटात हिंमत असेल आणि स्वत:च्या कर्तृत्वशक्तीवर विश्वास असेल तर पैसा लोळण घेत पायाशी येतो. लग्न करणारी मुलगी नुसतं शिक्षण पाहात नाही, तिचं लक्ष नवऱ्याला मिळणाऱ्या पैशाकडेही असतंच असतं. समाजही तुमचं नुसतं शिक्षण पाहात नाही, तो तुमच्या जीवनातील यश पाहतो, तुमचं कर्तृत्व पाहतो आणि तुम्हाला समाजमानसात स्थान देतो.’
रितेशला स्वत:चं स्टार्टअप सुरू करायचं होतं. त्यानं पुढचामागचा विचार न करता कॉलेज सोडलं आणि उडी घेतली स्व-व्यवसायात. तोही असा की, पूर्वी कुणी प्रयोग करून न पाहिलेला. कामानिमित्तानं दिल्लीत येणाऱ्या उद्योग-व्यावसायिकांची खिशाला परवडणाऱ्या दरात हॉटेलात राहण्याची सोय व्हायला हवी, हे रितेशनं स्वानुभवावरून जाणलं होतं. पण ही गरज दिल्लीपुरतीच नव्हती. रितेशनं त्यावरचं उत्तर काढलं आणि २०१२मध्ये सुरू केलं ओराव्हेल स्टेज.
रितेशनं ओराव्हेलचं डिझायनिंग केलं होतं, एअर‘वीएनबी’च्या धर्तीवर. ओराव्हेल स्टेजच्या काळात रितेश असा शंभरेक हॉटेल्समध्ये तरी राहिला असावा. परंतु त्या वास्तव्यात त्याच्या नजरेला एक गोष्ट आली की, या हॉटेल्सचं स्टॅँडर्डायझेशन झालेलं नाही. ते करण्याची गरज मात्र आहे. व्हेंचर नर्सरीकडून रितेशला ३० लाखाचं अर्थसाहाय्य झालेलं होतंच. त्याचा उपयोग रितेशनं व्यवसायावरची मांड पक्की करण्यासाठी केला. रितेशनं मग ‘ओवायओ रुम्स’ नावानं स्वत:ची स्टॅँडर्डाइझ्ड रुम्सची ग्राहकसेवा सुरू केली. एसी रुम्स, टीव्ही, शुभ्र चादरी, नि:शुल्क न्याहारी, मोफत वायफाय सेवा, स्वच्छ आणि निरोगी वॉशरुम्स, टॉयलेटरीज किट, सहा इंचाचा शॉवर हेड, बीव्हरेज ट्रे अशा अनेक सुविधा त्यात अंतर्भूत आहेत. सगळ्या सुविधा देतो आहोत, असं विचारतानाच, ‘और क्या चाहिये’ हा प्रश्न उपस्थित करणारी नवी टॅगलाइन ‘ओवायओ’नं ग्राहकांपुढे ठेवली. गंमत म्हणजे, या सुविधा कायम आहेत की नाही, हे तपासणारी त्याची यंत्रणाही कायम कार्यरत असते. ९९९ रुपये ते ४ हजार रुपये भाड्याच्या रुम्स ‘ओवायओ’ देऊ करते.
जानेवारी २०१३मध्ये ‘ओवायओ’ला सुरुवात झाली, तेव्हा गुरगावमधल्या हुडा सिटी सेंटर या एका हॉटेलपुरतंच ते मर्यादित होतं. जून २०१३मध्ये ती संख्या तीनवर गेली. जुलै २०१४मध्ये १३ झाली आणि आज हा मजकूर प्रसिद्ध होत असताना डिसेंबर २०१५मध्ये १३८ शहरांमधल्या ३५००हून अधिक हॉटेल्समध्ये ‘ओवायओ’ सेवा सुरू झाली आहे. आज ओवायओ रुम्स हे स्टार हॉटेल्सचं ब्रॅण्डेड नेटवर्क बनलं आहे. या १३८ गावांमध्ये देशातली प्रत्येक राज्याची राजधानी आहेच; परंतु महाराष्ट्रातही मुंबई, रत्नागिरी, माथेरान, महाबळेश्वर, कोल्हापूर, पुणे, शिर्डी, लोणावळा, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, खंडाळा अशी जवळपास पंधरा शहरं ‘ओवायओ’ला जोडली गेली आहेत.
‘ओवायओ’ सुरू झालं तेव्हा रितेशचं वय होतं जेमतेम १८. २०१५च्या १६ नोव्हेंबरला रितेशनं २४व्या वर्षात पदार्पण केलंय. आज ‘ओवायओ’च्या स्टाफचं सरासरी वय आहे जेमतेम २५. अभिनव सिन्हा हा कंपनीचा सीओओ. त्यानं खरगपूरच्या आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि हार्वर्डमधून एमबीए. दहाएक वर्षं त्यानं उत्पादन आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांचा अनुभव घेतला. ‘ओवायओ’त येण्यापूर्वी काही काळ डल्लासमधल्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा प्राचार्य म्हणूनही तो काम पाहात होता. परंतु इतक्या अल्प वयात ‘ओवायओ’ रुम्स सारखं नवं स्टार्टअप सुरू करण्याची रितेशची हिंमत त्यानं पाहिली आणि तो ‘ओवायओ’त दाखल झाला.
बिजुल सोमय्यांच्या व्हेंचर नर्सरीनं रितेशला पहिलं अर्थसाहाय्य केलं; परंतु त्यानंतरची ‘ओवायओ’ची प्रगती पाहिल्यानंतर लाइटस्पीड इंडिया, सॉफ्टबॅँक ग्रुप, ग्रीनओक्स कॅपिटल, सिक्विया कॅपिटल याही कंपन्या पुढे झाल्या. दोन वर्षांच्या थिएल फेलोशिपसाठी निवडला जाणारा तो पहिला भारतीय ठरला. वय वर्षं २२ खालच्या कॉलेज ड्रॉप-आऊटसाठीच थिएलची ही फेलोशिप असते, हे विशेष.
‘ओवायओ’ सुरू झालं तेव्हा रितेशचं वय होतं जेमतेम १८. २०१५च्या १६ नोव्हेंबरला रितेशनं २४व्या वर्षात पदार्पण केलंय. आज ‘ओवायओ’च्या स्टाफचं सरासरी वय आहे जेमतेम २५. अभिनव सिन्हा हा कंपनीचा सीओओ. त्यानं खरगपूरच्या आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि हार्वर्डमधून एमबीए. दहाएक वर्षं त्यानं उत्पादन आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांचा अनुभव घेतला. ‘ओवायओ’त येण्यापूर्वी काही काळ डल्लासमधल्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा प्राचार्य म्हणूनही तो काम पाहात होता. परंतु इतक्या अल्प वयात ‘ओवायओ’ रुम्स सारखं नवं स्टार्टअप सुरू करण्याची रितेशची हिंमत त्यानं पाहिली आणि तो ‘ओवायओ’त दाखल झाला.
बिजुल सोमय्यांच्या व्हेंचर नर्सरीनं रितेशला पहिलं अर्थसाहाय्य केलं; परंतु त्यानंतरची ‘ओवायओ’ची प्रगती पाहिल्यानंतर लाइटस्पीड इंडिया, सॉफ्टबॅँक ग्रुप, ग्रीनओक्स कॅपिटल, सिक्विया कॅपिटल याही कंपन्या पुढे झाल्या. दोन वर्षांच्या थिएल फेलोशिपसाठी निवडला जाणारा तो पहिला भारतीय ठरला. वय वर्षं २२ खालच्या कॉलेज ड्रॉप-आऊटसाठीच थिएलची ही फेलोशिप असते, हे विशेष.
रितेशला बिझिनेस वर्ल्ड यंग आंत्रप्रुनर्स अॅवॉर्ड तर पहिल्याच वर्षी मिळालं; परंतु त्यानंतरच्या गेल्या दोन-तीन वर्षांत इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट अॅवॉर्ड, लुफ्तान्सा इटी नाऊ रनवे टू सक्सेस अॅवॉर्डही मिळालं. थिएलनं फेलोशिप देऊ केली त्याच वर्षी म्हणजे २०१३मध्ये टाटानं निवडलेल्या देशभरातील पहिल्या ५० निवडक तरुण उद्योजकांमध्ये रितेशच्या ‘ओवायओ’चा क्रमांक लागला. असे अनेक टप्पे रितेश गाठतो आहे. ‘ओवायओ’ वुई ही नवी सेवा लॉन्च झाली आहे, ती आहे एकेकटीनं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी. प्रथम श्रेणीच्या शहरांतच सध्या ती सुरू आहे, परंतु ती चालवणारी यंत्रणाही संपूर्णपणे महिलांच्याच हातात आहे. ‘ओवायओ’चं उद्दिष्ट अगदी साधं सोपं आहे. घराबाहेर राहणाऱ्या मंडळींना घरीच राहिल्यासारखं वाटावं, अशा सुविधा ‘ओवायओ’ देते आहे. आजपर्यंत १५ लाख दिवसांचं रुम-बुकिंग ‘ओवायओ’नं केलं आहे. दिवसाचे २४ तास ‘ओवायओ’ची सेवा उपलब्ध आहे. आजवर ३० लाख लोकांनी फोन करून ‘ओवायओ’कडे सेवा मागितली आहे. हे प्रमाण वर्षाला एक कोटीच्या घरात जावं, यासाठी ‘ओवायओ’ची धडपड सुरू आहे.
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com
sumajo51@gmail.com
Share
No comments:
Post a Comment